रामराज्य की रयतेचे राज्य (स्वराज्य) ?
- अभिजित गणापुरे
#जय_श्री_राम
की
#हर_हर_महादेव ?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सांस्कृतिक नळाखाली गांधी द्वेषाने पूर्ण भिजलेल्या नथुराम गोडसेनं 30 जानेवारी 1948 रोजी गांधींची हत्या केली. त्या वेळी काँग्रेसने संघावर बंदी घातली होती तेव्हा संघाला कोण काळ कुत्रही विचारत नव्हतं.
म्हणून संघाला तात्विक अधिष्ठान देणाऱ्या त्यांच्या आदरणीय गोळवलकर गुरुजींना राजकारण केल्याशिवाय हिंदू राष्ट्र निर्मिती होणार नाही याची प्रचिती आली,आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली शामाप्रसाद मुखर्जी यांनी प्रथम भारतीय जनसंघाची स्थापना केली व त्यानंतर त्याचं रूपांतर भारतीय जनता पक्षात झालं.
खरं तर गोळवलकर आणि हेडगेवार यांचा सर्व अट्टाहास हा हिंदु राष्ट्र निर्मितीचा होता. हिंदुराष्ट्र म्हणजेच ब्राह्मनेतर सर्व जातींवरील वर्चस्वाचं राज्य. आणि त्यासाठी येथील ब्राह्मनेतर जातींना गुलाम करण्यासाठी 'रामराज्य' नावाचं गुंगीचे औषध देण्याची गरज त्यांना भासली. भारतीय जनसंघ आणि आत्ताच्या बीजेपीच्या कोणत्याही अधिवेशनात 1984 पर्यंत राम जन्मभूमी, राम मंदिर असा कोणताही मुद्दा नव्हता. पण त्यात फक्त सत्तेवर डोळा ठेवणाऱ्या संघ बीजेपी ने येथील ब्राह्मनेतर जातींवर वर्चस्व गाजवण्यासाठी 'राममंदिर' अर्थातच रामराज्य नावाचं गुंगीचे औषध पाजण्यासाठी राम मंदिराला निवडणुकीच्या आखाड्यात खेचलं. आजचा राम मंदिर भूमिपूजन सोहळा हा त्याचं फळ आहे.
सर्व भारत देश हा दारिद्र्याच्या गाळात रुतून गडप होत असताना आणि देशाच्या सर्वच क्षेत्रात हाहाकार माजला असताना हा राम मंदिर भूमिपूजन सोहळा म्हणजे येथील ब्राम्हणेतर जातींना गुलाम करून वर्चस्व गाजवण्याच्या दिशेनं टाकलेलं आणखीन एक मोठं पाऊल आहे. बीजेपी च्या घोषणा पत्रात घोषित केल्या प्रमाणे काही महिन्यापूर्वी 370कलम हटवण्यात आलं. आज राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा होतोय मंदिर होईल आणि त्यानंतर समान नागरी कायदा कायद्याची चौकट तयार करणे ही त्यांची पुढील वाटचाल असेल.
खरं म्हणजे आजचा भूमिपूजन सोहळा हा येथील सर्व प्रवाहाच्या परिवर्तनवाद्यांच्या (सर्वांची नावे घेत नाही आता) अकार्यक्षमतेचे प्रतीक आहे. हिंदुत्ववादी लोक/प्रवाह ब्राह्मणी राज्य आणण्यासाठी जितके भारावलेले आहेत तितकेच येथील परिवर्तनवादी भरकटलेले आहेत. (काही अपवाद वगळून) गोळवलकर लिखित bunch of thoughts आणि we and our nationhood defined वर चालणाऱ्या संघ बीजेपीचा वन अँड ओन्ली एकच अजेंडा आहे. येथील जनतेला रामराज्य नावाचं गाजर दाखवून ब्राह्मणी राज्य प्रस्थापित करायचं. या एकती एकच ध्येयासाठी ते अनेक प्रकारे अहोरात्र कार्यरत आहेत. म्हणून तर देशात कोरोनाची आणीबाणी लागली असतानाही देशाला या आणीबाणीतून बाहेर काढण्या ऐवजी यांना राम मंदिर महत्त्वाचे वाटतय.
संपूर्ण देश घरांमध्ये अडकला असताना आणि या महामारीमुळे 'भारतमाता' जखमी असताना सुद्धा हा सोहळा होतोय म्हणजे भारत मातेच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. असंवेदनशीलतेचा, बावळटपणाचा अस्सल नमुना आहे."बड्या-बड्या बाता आणि गांड खाई लाता" म्हणल्यासारख देशाला "आत्मनिर्भर व्हा!" असं म्हणायचं आणि त्यासाठी फक्त मंदिर बांधायचं. आमचा मंदिर बांधान्याला विरोध नाही. रामाची भक्ती करण्याला, रामावर श्रद्धा असण्याला पण विरोध नाही. पण, जर फक्त मंदिर बांधून देश महासत्ता होत असेल, आत्मनिर्भर होत असेल, तर असे मंदिर प्रत्येक जिल्ह्यात बांधा. आमचं काहीच म्हणणं नाही, पण आधी देशाला आत्मनिर्भर तर बनवा.
मुंग्यांच्या वारुळातुन मुंग्या बाहेर पडल्यासारख कोरोना पेशंट वाढत आहेत आणि १३० करोड जनता असणार्या देशात अंदाजे फक्त 19 लाख हॉस्पिटल बेड, 95000 ICU बेड आणि 48000 व्हेंटिलेटर आहेत. आपलं सरकार हे जीडीपीच्या कुतून कुतुन जीडीपीच्या 1.3 टक्के आरोग्य व्यवस्थेसाठी खर्च करतय. त्यामुळे सरकारी दवाखान्यात उत्तम दर्जाच्या सुविधा भेटत नाहीत.*१ प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये गेल्यास तेथील डॉक्टर भरमसाठ बिल वाढवल्यामुळे रक्षक वाटणारे डॉक्टर भक्षक वाटतात. भारतासारख्या विकसनशील, गरीब देशांमध्ये इतक्या प्रमाणात प्रायव्हेट हॉस्पिटल ची काय गरज? पैसे उकळणारं क्षेत्र झालेल्या प्रायव्हेट हॉस्पिटलचे राष्ट्रीयीकरण करण्याचं धोरण राबवण्याचा शहाणपणा फक्त मंदिर बांधणार्या सरकारने केला पाहिजे. पण हे करायचं सोडून देशी दारू पिण्यासाठी घरातील सामान विकणाऱ्या अट्टल बेवड्या प्रमाणे बीजेपी सरकारने देशाच्या 23 सार्वजनिक कंपन्यांमधील सरकारी हिस्सेदारी विकण्याची मंजुरी दिली आहे.*२ एकीकडे आत्मनिर्भरतेच्या पोकळ गप्पा मारायचं आणि आपल्याच देशाचा लिलाव करायचं, असले डबल ढोलकी धोरण राबवून आपण आत्मनिर्भर बनणार आहोत का?
8 नोवेंबर 2016 रोजी अचानकपणे नोटबंदीचा निर्णय घेण्यात आला असाच हा मंदिराच्या भूमिपूजनाचा निर्णय आहे. दाखवायचं एक आणि करायचं एक. काय झालं नोटबंदी करून? ३-४ लाख करोड रुपये परत येणार नाहीत अशी अपेक्षा वर्तवली जात असताना फक्त १० हजार करोड रुपये परत नाही आले. म्हणजे RBI च्या रिपोर्ट नुसार ९९.३% नोटा परत आल्या. मग काळा पैसा आला नाही म्हणजे नोटबंदी फेल गेली. खरंतर नोटबंदी ही मोठ्या उद्योगपतींचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी करण्यात आलेला घोटाळा होता. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचं कंबरड मोडून पडलं*३ आणि आता या कोरोना काळातील lockdown मुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे तीन तेरा झालेले आहेत. देशाचा विकास दर हा पहिली तिमाही ५.२%, दुसरी तिमाही ४.४%, तिसरी तिमाही ४.१%, चौथी तिमाही ३.१% अशा रीतीने खाली घसरून पाताळात जात आहे. म्हणजेच आर्थिक वर्ष 2020 चा सरासरी विकास दर ४.२% इतका आहे.*४ हेच बीजेपी सरकार जेव्हा सत्तेत आलं तेव्हा २०१४-१५ चा विकास दर हा ७.३% इतका होता.*५ या सगळ्यापासून ईथल्या जनतेचे लक्ष हटवण्यासाठी आणि आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचा अट्टाहास बीजेपी सरकार करत आहे.
साधारण मार्च महिन्यापासून देशात lockdown आहे. त्या अनुषंगाने सर्व लोक घरांमध्येच अडकून आहेत. कित्येक जणांचे खायचे-प्यायचेसुद्धा वांदे झाले आहेत. आणि त्यातच म्हणून की काय दुष्काळात तेरावा महिना म्हटल्याप्रमाणे घरात बसलेल्या कित्येक लोकांना आता कायमचं घरातच बसावं लागणार आहे, कारण CMIE च्या मते भारताचा बेरोजगारी दर हा ते २३% वर पोहोचला आहे.*६ पहिल्यांदा labour participation rate हा ४२% च्या खाली गेला आहे. labour force जानेवारी २०२० मध्ये ४४.३० कोटी व मार्च २०२० मध्ये ४३.४० कोटी (कमी झाले). रोजगार असणाऱ्यांची संख्या जानेवारी २०२० मध्ये ४१.१० कोटी व मार्च २०२० मध्ये ३९.६० कोटी (कमी झाले). बेरोजगारांची संख्या जानेवारी २०२० मध्ये ३.२० कोटी व मार्च २०२० मध्ये ३.८० कोटी (वाढले). ही तर फक्त सुरुवात आहे, कारण मे महिन्यातील बेरोजगारी दर हा २३% पेक्षा जास्त वाढून २७.११% इतका झाला आहे.*७ आणखीही वाढू शकतो दरवर्षी २ करोड रोजगाराची घोषणा करणाऱ्या आपल्या विद्वान पंतप्रधान मोदीजींनी बेरोजगारीवर राम मंदिरा सारखा रामबाण उपाय शोधून आणला आहे.
मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणीही खाणारं आणि सत्तेवर येण्यापूर्वी खोटा पुळका दाखवून पेट्रोल भाववाढी विरोधात आंदोलन करणारं बीजेपी सरकार मात्र, पेट्रोल वरील कर प्रति लिटर १० रुपये आणि डिझेलवरील कर प्रति लिटर १३ रुपये वाढवून दररोज इथल्या करोडो जनतेच्या खिशावर डाका घालत आहे. आंतरराष्ट्रीय इंधन दरामध्ये घट झाली असताना देखील पेट्रोल वर ३२.९८ रुपये प्रति लिटर आणि डिझेलवर ३१.८३ रुपये प्रति लिटर कर वसूल करत आहे.*८ हेच बीजेपी सरकार जेव्हा सत्तेत आलं तेव्हा आपल्याला पेट्रोल वर ९.४८ रुपये प्रति लिटर आणि डिझेलवर ३.५६ रुपये प्रति लिटर कर द्यावा लागत होता. आणि याचाच परिपाक म्हणून खाण्यापिण्याच्या गोष्टींचे म्हणजेच, डाळी १६.७ %, मांस आणि मासे १६.२%, दूध ८.४%,भाव वाढले आहेत*९ त्यामुळे आता जर कोणाच्या घरातील लेकरं रडत असतील तर त्यांना रामाच्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत.
खाण्यापिण्याच्या गोष्टींचे भाव तर नेहमीच वाढत आहेत पण जो हे पिकवतो त्याच्या नशिबाला मात्र सदैव दारिद्र्य येत आहे. आपण पीकवलेल्या अन्नाची योग्य किंमत मिळावी म्हणून आणि इतर काही मागण्या घेऊन देशातील शेतकरी वर्ग २ ऑक्टोबर २०१८ रोजी दिल्लीच्या राजघाटवर गेला असता त्यांच्यावर अश्रूंधूर, पाण्याचा मारा आणि लाठी चार्ज करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यात आलं. २०१८ मध्ये देशाच्या जवळपास सर्वच राज्यातील शेतकरी वर्गाच्या आंदोलनाला आणि त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणून राम मंदिराची पायाभरणी केली जात आहे. आता शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न मंदिर बांधून सुटणार आहेत काय??
शेतकरी तर शेतकरी पण शेतकऱ्यांच्या लेकरांचं भवितव्यही अंधकारात लोटण्याचा डाव बीजेपी सरकार खेळत आहे. या देशाला गुलाम बनवणाऱ्या इंग्रजांनीही कधी देशातील कॉलेज लायब्ररी मध्ये घुसून तेथील विद्यार्थिनींना कधी मारलं नाही. पण, या बीजेपी सरकारच्या कार्यकाळात इथल्या बहुजनांच्या शिक्षणाची केंद्र असलेल्या विद्यापीठांवर हल्ला करून, ती केंद्र उध्वस्त करून परत एकदा येथील जनतेला शिक्षणा पासून वंचित ठेवून गुलाम बनवण्याचा कुटील डाव हे सरकार खेळत आहे. म्हणूनच ब्राह्मणी वर्चस्वासाठी प्रयत्नशील असणाऱ्या सरकारने रोहित वेमुलाचा बळी घेऊन आपले काळे इरादे दाखवून दिले आहेत.वर उहापोह केल्याप्रमाणे कामगार, शेतकरी, विद्यार्थी त्रस्त आहेत. देशाची अर्थव्यवस्था रसातळाला जाण्याची थांबता थांबेना. या देशातील आरोग्य आणि शिक्षणासारख्या मूलभूत गरजांच्या क्षेत्रांमध्ये पैशांचा बाजार मांडला जात आहे. देशाच्या सार्वजनिक संपत्तीचा आणि कंपन्यांचा लिलाव करून देश विकला जात आहे. शेतीवरील दुष्काळाचं संकट काही हटता हटत नाही. दैनंदिन जीवन जगणं बत्तरातून बत्तर होत चाललं असताना या प्रश्नांवर उपयोजनात्मक धोरण राबवण्या ऐवजी जनतेच्या प्रश्नाकडे ब्राह्मणी वर्चस्ववादी सरकार दुर्लक्ष करत आहे व त्यांच्या दुःखाची थट्टा मांडली जात आहे. हेच जर तुमचे "अच्छे दिन" असतील अन हेच जर तुमचं रामराज्य (रामराज्य कसलं, गुंडाराज्य आहे हो) असेल तर असल्या बकवास आणि आभासी रामराज्याला-गुंडाराज्याला आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून १० वेळेस कोलतो. हे तुमचं ब्राह्मणी वर्चस्वाचे रामराज्य नकोय. आम्हाला आमच्या छत्रपती शिवरायांचं रयतेचं राज्य हवय. स्वराज्य हवय.
त्याची पण एक मोठी गोची या 'रामराज्य' आणि 'हिंदुराष्ट्र' वाल्यांनी करून टाकलीय. 'रयतेच्या राज्याला' हिंदूराज्य म्हणून. त्यांचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. हिंदूराज्याच्या नावाखाली हिंदूंना मुस्लीम आणि ख्रिश्चन लोकांचं भय दाखवून संघटित करायचं, संघटित कसलं गुलाम करायचं असंच म्हणावं लागेल. कारण हिंदूराष्ट्र-हिंदूराज्य-रामराज्य नावं काहीही असोत त्यांचे वर्चस्व हे इथल्या ब्रम्हणांकडेच असतं. आणि ब्राम्हणेतर सर्व जाती या त्यांच्या वर्चस्वाखाली गुलाम म्हणून जगत असतात. हा त्यांचा हिंदूराष्ट्राचा खरा अजेंडा साध्य करण्यासाठी जनतेला दाखवण्यासाठी एक शत्रू लागतो तो म्हणजे मुस्लिम समाज आहे. सांगायचं असं की मुस्लीम आणि ख्रिश्चन यांच्या विरुद्ध इथल्या सर्व ब्राह्मणेतर जातींना एकत्र करण्यासाठी छत्रपती शिवरायांना मुस्लिम द्वेष्टा हिंदूराजा म्हणून प्रेझेंट केलं जात.
खरंतर छत्रपती शिवराय हे रयतेचे राजे होते. इथल्या ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर सर्व जातीतील शोषित-पीडित जनतेचे राजे होते त्यांचा मुख्य शत्रू हे मुघल-तुर्क होते. आणि त्यांचा दुसरा शत्रू हा इथले ब्राह्मण जातीतील वर्चस्ववादी लोक आणि स्वजातीतील ब्राह्मणी-भांडवली मूल्य असणारे सरंजामदार हे होते. छत्रपती शिवरायांनी या दोन्ही शत्रूंना कोलून 'रयतेचे राज्य' म्हणजेच शोषित-पीडितांच राज्य उभं केलं. स्वराज्य उभं केल.
आता ही २१व्या शतकात आपल्याला रयतेच्या राज्याची पुनर्निर्मिती करायची असेल तर आपल्याला ब्राह्मणी-भांडवली मूल्य आणि वर्चस्व झुगारून देऊन सर्वच जातीतील शोषित-पीडित-वंचित लोकांचं समता प्रस्थापित करणार 'रयतेचे राज्य' निर्माण करावं लागेल. जसं शरद पाटील म्हणतात त्याप्रमाणे शिवरायांसमोर मुख्य शत्रू तुर्क-मुघल आणि दुसरा शत्रू ब्राह्मण जातीतील सरंजामदार वर्गातील लोक होते. तसेच आता आपल्या समोर देशी-विदेशी भांडवलदार वर्ग हा आपला मुख्य शत्रू आहे. (मुस्लिम ख्रिश्चन नव्हे) आणि देशी-विदेशी भांडवलदारांच्या इशार्यावर नाचणारे ब्राह्मणी-भांडवली विचारधारेचे सरकार व त्या सोबत असणारे त्याच ब्राह्मणी-भांडवली विचार,मूल्याचे वाहक असलेले ब्राह्मणेतर सर्वच जातीतील उच्चवर्गीय प्रस्थापित लोक हा आपला दुसरा शत्रू आहे. छत्रपती शिवरायांनी स्वजातीतील सरंजामदार यांचा नायनाट केला होता, तसंच आपल्याला आपापल्या स्वजातीतील उच्चवर्गीय प्रस्थापितांविरुद्ध संघटित व्हाव लागेल. त्यांचं नेतृत्व झुगारून त्यांचा बहिष्कार करावा लागेल. त्यांच्यात रुजलेल्या ब्राह्मणी-भांडवली मूल्यामुळे ते आपल्याच जातीतील शोषित-पीडित लोकांचं शोषण करत असतात. स्वतःच्या फायद्यासाठी आपल्याच जाती-समाजाला प्रस्थापितांच्या दावणीला नेऊन बांधतात. असे हे स्वजातीतील शत्रु आपल्याला ओळखावे लागतील, कारण हे प्रत्येक जातीमध्ये तयार झाले आहेत आपलं संघटन हे जातीनिहाय नसून सर्वच जातीतील शोषित-पीडित-वंचितांचं संघटन करून सर्वच जातीतील उच्चवर्गीयाविरोधात एक व्हावं लागेल. त्याशिवाय आपण आपल्या एकाही शत्रूला हरवू शकणार नाही. जर रयतेचं राज्य आणून शिवरायांचं दिल्ली काबीज करण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर प्रत्येक जातीतील शोषित-पीडितांना इतर सर्व जातीतील शोषित-पीडितांवर होणार्या अन्यायाविरुद्ध, शोषणाविरुद्ध आवाज उठवावा लागेल. एकमेकांना एकमेकांच्या मदतीला जाऊन जातीअंत करावा लागेल.
काळ बदललाय, आजचा काळ हा २१ व्या शतकातील आहे. म्हणून मी उपसा तलवार आणि चला शत्रूला कापायला असं तर म्हणणार नाही. पण पुस्तक पेन उचलण्याशिवाय आजच्या काळातील 'रयतेचे राज्य' निर्माण होऊच शकत नाही. पुस्तक वाचल्याशिवाय महामानवाचे खरे विचार आत्मसात करून आचरण केल्याशिवाय रयतेच्या राज्यात राहण्याच्या लायकीचा समाज तयार होणार नाही. समाजातील ब्राह्मणी-भांडवली वर्चस्ववादी मूल्यांचा नाश केल्याशिवाय 'रयतेचं राज्य' निर्माण होणार नाही. छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनो आता वेळ आलेली आहे की एका काल्पनिक पुस्तकातिल विचारांवर आधारित इथल्या ब्राह्मणेतर जातींना गुलाम बनवणारे 'रामराज्य' निर्माण करायचं, का आपल्या सर्वांच्या मनात ३५० वर्षांनंतरही जिवंत असणाऱ्या शिवरायांचं 'रयतेचे राज्य' निर्माण करायचं हे आपल्याला आता ठरवावं लागेल. छत्रपती शिवरायांचं 'रयतेच राज्य' पुनर्निर्माण करण्यासाठी #मराठा_लिब्रेशन_टायगर-संघटना ताठ मानेने वाटचाल करत आहे. आपल्यालाही शिवरायांचे स्वप्न, गेलेलं स्वराज्य, 'रयतेचे राज्य' पुन्हा निर्माण करायचं असेल तर या वाटचालीत सामील व्हा.
हर हर महादेव!
हर हर महादेव!!
हर हर
महादेव!!!
संदर्भ:::
१:: THE HINDU,11-JUNE-2020
२:: जनसत्ता, २८- जुलै- २०२०
३:: PRIME TIME WITH RAVISH KUMAR, 30- AUG-2018
४:: INDIA TODAY, 29-MAY-2020
५:: ABP NEWS, 29-MAY_2015
६::PRIME TIME WITH RAVISH KUMAR, 7-APR-2020
७:: THE HINDU, 5-MAY-2020
८:: THE HINDU, 5-MAY-2020
९:: THE HINDU, 16-JULY-2020
(लेखक मराठा लिब्रेशन टायगर संघटनेचे संस्थापक सदस्य व युवा विचारवंत आहेत.)..