पत्रकार अवमान व मारहाण प्रकरणी पत्रकार संघटनेचे पालकमंत्री अमित देशमुख याना निवेदन : संबंधित पोलिस आधिकार्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन
लातूर - प्रतिनिधी
17 ऑगस्ट 2020
कोरोना लॉकडाऊनच्या काळामध्ये लातूर जिल्ह्यातील पत्रकारावर पोलिसाकडून अपमानास्पद वागणूक व मारहाण प्रकरणी लातूर जिल्ह्यातील पत्रकार संघटनेच्या वतीने वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे अमित देशमुख यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पालकमंत्री संबंधित पोलिस आधिकार्यावर योग्य ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले.
लॉकडाऊनच्या काळामध्ये लातूर पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिंह घोणे यांना लातूर शहर पोलीस डिवायएसपी सचिन सांगळे यांच्याकडून काठीने मारहाण व दूरदर्शन चॅनलचे दीपकरत्न निलंगेकर यांना अपमानास्पद वागणूक तसेच शहरातील इतर पत्रकारांनाही एकेरी शब्दात बोलणे हे उदाहरण ताजे असताना 1 ऑगस्ट रोजी ज्येष्ठ पत्रकार रघुनाथ बनसोडे यांना अर्वाच्च भाषेत बोलणे, त्यांच्यावर हात उगारणे व एखाद्या गुन्हेगार माणसासारखे पोलीस गाडीत डांबून शहरभर मिरवणे असे प्रकार सचिन सांगळे यांच्याकडुन घडलेले आहेत. यांनी हे जाणून बुजून केले असुन या संदर्भात त्यांचा सामान्य जनता व प्रतिष्ठित व्यक्तींशी व्यवहार योग्य नाही. फक्त लातूर शहरातच नाही तर औसा, निलंगा, उदगीर अहमदपुर ,या तालुक्यातही पत्रकाराना पोलिसी दडपशाहीला सामोरे जावे लागले आहे. हे थांबले पाहिजे. ही भावनाही पत्रकार बंधुनी मंत्रीमहोदयासमोर मांडली.लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकारावर पोलिसांकडून वारंवार मारहाण होणे व अपमानास्पद वागणूक होणे हे चुकीचे असून यासंबंधी आपण तात्काळ अहवाल मागवून घेऊ व संबंधित अधिकाऱ्यावर कडक कार्यवाही करू,असे आश्वासन यावेळी ना.अमित देशमुख यांनी पत्रकारांना दिले आहे.
पत्रकार रघुनाथ बनसोडे,अशोक देडे, नरसिंह घोणे,लिंबराज पन्हाळकर, बालाजी वागलगावे, दीपरत्न निलंगेकर, अशोक हनवते, ज्ञानेश्वर सागावे, संगम कोटलवार, विष्णू अष्टेकर,दिगंबर तारे,महादेव डोंबे ,अरुण कांबळे आदी पत्रकार बांधवांच्या स्वाक्षर्या आहेत.