कोरोनाग्रस्त वृद्ध महिलेला आरोग्य कर्मचाऱ्याकडून मारहाण : जिल्हाधिकार्यानी दिले चौकशीचे आदेश 

कोरोनाग्रस्त वृद्ध महिलेला आरोग्य कर्मचाऱ्याकडून मारहाण : जिल्हाधिकार्यानी दिले चौकशीचे आदेश 



लातूर - प्रतिनिधी  


10 ऑगस्ट 2020


लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल झालेल्या कोरोनाग्रस्त वृद्ध महिला रुग्णास रुग्णालयातील कोरोना वार्डातील कर्मचाऱ्याने मारहाण केल्याची संतापजनक घटना 8 ऑगस्टच्या पहाटे घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेचा मुलगा बबन पाटोळे यांनी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याकडे तक्रार केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि. ७ ऑगस्ट रोजी शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथील कोंडाबाई शेषेराव पाटोळे या ६२ वर्षीय कोरोना बाधित वृद्ध महिला रुग्णावर उपचार करण्यासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना दिनांक ८ ऑगस्ट शुक्रवार रोजी पहाटे अंदाजे २ च्या सुमारास या वृद्ध महिलेला श्वास घेण्यास त्रास वाटत असल्यामुळे त्या वृद्ध महिला रुग्णाने वार्डातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांस त्रास होत असल्याची माहिती दिली. मात्र सदरील कर्मचाऱ्याने उपचार करणे तर सोडाच पण धावत येवुन त्या वृद्ध महिलेच्या तोंडावर सपासप चापटा मारायला सुरूवात केली. या मारहाणीत या वृद्ध महिलेचे तोंड सुजले आहे. हा संतापजनक प्रकार लक्षात आल्यावर ही माहिती महिलेच्या मुलाने फोनवरून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीना दिली. . झाल्या प्रकारामुळे कोरोनाग्रस्त महिला रुग्ण घाबरून गेल्यामुळे तिचा पल्स रेट कमी होवु लागल्याने प्रकृती गंभीर झाली. त्यामुळे शासकीय रुग्णालयातून बदली करून शहरातील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लातूर येथे शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्याच्या वर्तणुकीमुळे , झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे माझ्या आईला मानसिक धक्का बसला असुन आम्हांला न्याय मिळावा अशी भावना पाटोळे यांनी समाजमाध्यमांसमोर व्यक्त केली. या संपूर्ण प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.