युगानुयुगे निर्भया
कालची संस्कृती आज झाली परंपरा
उद्याही डोईवर तिचा हा अवजड पसारा.
तिची तिच कुजबूज चारचौघात
का ओलांडावी लक्ष्मणरेषा ?
योग्य आहे का द्रौपदीची भाषा
किती हसते, हुंदडते तोकडया कपड्यात.
सीता द्रौपदी आज निर्भया
संपली वेदना मरणानी केली सुटका.
रस्त्यावरी नाक्यावरी घरीदारी
टोचली छेडली ओरबाडली सारी.
पेटली चहू दिशांनी तिची चिता
मग आरडा-ओरडा कोरडी चिंता.
पावलो पाऊली क्षणोक्षणी भयभीत
सीता द्रौपदी आज निर्भया.
मातीत माती राखेत मिसळुन राख
मरणात सुटका संपते तिची यातना.
हटले चंद्रग्रहण अन सुटले सूर्यग्रहण
तिच्या वाट्याला युगानुयुगे खग्रासग्रहण.
रावण दुर्योधन दु:शासन तिच्याच वाट्याला.
कालची संस्कृती आजची परंपरा तिच्याच नात्याला.
राहूल इंगळे पाटील