पालघर हत्‍याकांडातील वाहन चालकाच्‍या दोन्‍ही मुली रमेशअप्‍पा कराडांनी घेतल्या दत्‍तक

 


पालघर हत्‍याकांडातील वाहन चालकाच्‍या दोन्‍ही मुली
रमेशअप्‍पा कराडांनी घेतल्या  दत्‍तक


लातूर – पालघर जिल्ह्यात दोन साधूंसह त्यांच्‍या वाहन चालकाचा जमावाने बेदम मारहान करून तीघांची निर्घुनपणे हत्या केली या घटनेने महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश हादरून गेला. या हत्याकांडात मृत्यु पावलेल्या वाहन चालक निलेश तेलगाडे यांच्या दोन्ही मुलींच्या शिक्षणासह त्‍यांची संपूर्ण जबाबदारी भाजपाचे लातूर जिल्हाध्यक्ष रमेशअप्पा कराड आणि अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप पाटील खंडापूरकर यांनी घेतली आहे.


             वाराणसी येथील पंचदक्षनाम जुना आखाडा येथील कल्पवृक्ष गिरी महाराज आणि सुशिल गिरी महाराज यांच्या विनंतीनूसार पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील मौजे कासा येथील वाहन चालक निलेश तेलगाडे यांना गुजरात राज्यातील सुरत येथे अंत्यसंस्कारासाठी घेवून जात असताना पालघर जिल्ह्यातील गडचिंचले चौकी पाडा येथे चुकीच्या अफवेमूळे जमावाने या दोन्ही महाराजासह वाहन चालकास बेदम मारहान केल्याने तीघांचाही दुर्दैवी मृत्यु झाला. देशभर लॉकडाऊन असतानाही घडलेल्या या हत्याकांडाने महाराष्ट्र राज्यच नव्हे तर संपूर्ण देश हादरून गेला.


          या हत्याकांडात मृत्यु पावलेले डहाणू तालुक्यातील मौजे कासा येथील निलेश तेलगाडे हे घरात एकटेच कमावते होते. वाहन चालवून ते आपल्या कुटुंबाची उपजिवीका भागवत असे. निलेश यांच्या दुर्दैवी मृत्युमूळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून निलेश तेलगाडे यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन मुली असल्याची माहिती मिळाली आहे.


          तेलगाडे यांच्या घरची कौटुंबीक परीस्थिती अत्यंत हालाकीची असल्याचे समजल्यावरून या कुटुंबासाठी भाजपाचे लातूर जिल्हाध्यक्ष रमेशअप्पा कराड आणि अ. भा. भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे राष्‍ट्रीय अध्यक्ष प्रदिप पाटील खंडापूरकर यांनी मदतीचा हात पुढे केला असून सदरील मयत निलेश तेलगाडे यांच्या शालिनी आणि सनिका या दोन्ही मुलींच्या शिक्षणासह त्‍यांची संपूर्ण जबाबदारी स्विकारून दत्‍तक घेतले आहे. भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष राजेश वर्तक आणि पालघर जिल्हा कार्यकारी अध्यक्ष किरण पवार यांच्या मार्फत या बाबतचा निर्णय तेलगाडे कुटुंबीयांना पाठविण्यात आला आहे.


          पालघर हत्याकांडात मृत्यु पावलेल्या तेलगाडे कुटुंबीयांना मदत करण्याचा निर्णय घेवून त्यांच्या दोन्ही मुलींना दत्‍तक घेतल्‍याबद्दल भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेशअप्पा कराड आणि अ. भा. भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रदिप पाटील खंडापूरकर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.