युद्ध इथले संपले नाही!
इसलिये राह संघर्ष की हम चले
जिंदगी आसुओ में नहाई नाहो
दुसरे महायुद्ध ! मानवी इतिहासातील आत्तापर्यंतचा सर्वात भयंकर नरसंहार .75 वर्षे होऊन देखील आजही या युद्धाच्या आठवणी मानवास त्याच्या एकूणच संस्कृतीचा आणि सभ्यतेच्या व्याख्यांचा पुनर्विचार करायला भाग पाडतात.जवळजवळ सहा वर्षे चाललेल्या या जागतिक युद्धात 1945 साली सोवियत युनियन च्या लाल फौजेने हिटलरच्या फौजांचा पराभव केला ,बर्लिनमध्ये जाऊन राइश्टागवर लाल झेंडा फडकवला आणि जर्मनीने शरणागती पत्करली. आठ मे च्या संध्याकाळी शरणागती दस्तऐवजांवर सह्या झाल्या आणि नऊ मे हा सोवियत युनियनमध्ये विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. 1991मध्ये सोवियत युनियन कोसळले परंतु ही विजयी दिवसाची परंपरा अजून चालू आहे. नाझी वरील या विजयाला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने हा लेख. सदरच्या लेखाचा उद्देश सोवियत युनियन ची युद्धा मधील भूमिका विशद करणे नाही,तर या युद्धाने सोवियत जनतेला काय दिले किंवा काय हिरावून घेतले याचा विमर्श घेणे हा आहे.
इतिहासकारांच्यात आता कोणतेही दुमत नाही की दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांनी फॅसिस्ट शक्तींवर जो विजय मिळवला त्यामध्ये सोवियत युनियनचा सिंहाचा वाटा होता परंतु ह्या विजयाची सोवियत जनतेला काय किंमत चुकवावी लागली याकडे आपण लक्ष वेधले तर मन खिन्न होऊन जाते. जवळजवळ पावणेतीन कोटी सोवियत नागरिकांचा बळी या युद्धाने घेतले. त्यातील एक कोटी 90 लाख हे माझ्या तुमच्यासारखे सामान्य नागरिक होते ,तर लाल रेड आर्मीतील जवळजवळ ऐंशी लाख सैन्यांना त्यांचा प्राण गमवावा लागला. एक संपूर्ण पिढी या युद्धाने खाक केली तर युद्धानंतरच्या पिढीला त्याने सामाजिक मानसिक दृष्ट्या लुळेपांगळे करून टाकले,लाखो कुटुंबे उध्वस्त झाली. युद्धात सहभागी असलेल्या दुसऱ्या कोणत्याही देशापेक्षा सोव्हिएत युनियनची प्राणहानी ही कित्येक पटीने अधिक होती. (अपवाद फक्त चीन - जवळजवळ दोन कोटी बळी) . फॅसिस्ट शक्तींंशी लढताना जिथे प्रत्येकी एक अमेरिकन सैनिक मारला गेला त्याच कामासाठी सोवियत युनियन चे प्रत्येकी 80 सैनिक मारले गेले. सोवियत भूमीवरील एकूण 60 टक्के घरातील कोणी ना कोणी व्यक्ती या युद्धात बळी पडला. वित्तहानी चा आकडा देखील काही कमी भयानक नाही. हे युद्ध मुख्यतः युरोपियन भूमीवर म्हटले गेले. त्यामध्ये देखील जर्मनी, पोलंड, सोवियत युनियन यांना सर्वाधिक फटका बसला.या युद्धात पश्चिम सोवियत भूमी अक्षरशः उध्वस्त झाली,जवळजवळ 70 हजार गावे , 1700 शहरे फॅसिस्ट शक्तींनी बेचिराख केलीत ; अडीच कोटी जनता बेघर झाली.माणसाला माणसातून उठणारे हे युद्ध होतं . इतकी प्रचंड प्राणहानी आणि वित्तहानी सोसूनही सोवियत जनतेने जगावर चालून आलेले हे फॅसिस्ट संकट थोपवलं. लाल झेंड्याखाली सोवियत सत्तेने मिळवलेला हा विजय म्हणजे त्यांची विसाव्या शतकातील सर्वात मोठी कामगिरी ठरली.
हे युद्ध केवळ भूमीसाठी किंवा व्यापारासाठीच युद्ध होतं का? नक्कीच नाही! हे युद्ध विचारसरणी मधील लढाई होती .शत्रूच्या संपूर्ण जीवनप्रणाली चा नाश करून त्यांना गुलाम बनविणे किंवा पूर्णता कत्तल करून त्यांचा पृथ्वीतलावरून नायनाट करणे हे फॅसिस्ट शक्तींचे ध्येय होतं. नाझींच्या दृष्टी पूर्व युरोपियन स्लाव वंशीय (त्यामध्ये देखील विशेषता बोलशेविक) आणि ज्यू वंशीय लोक हे युरोपियन जीवनावरच संकट होतं. त्यामुळे नाझींचा विजय म्हणजे 1917 ला क्रांती करून स्थापन झालेल्या सोवियत कम्युनिस्ट सत्तेचा अंत! एका विचारसरणीचा निर्णय पराभव!! त्यामुळे हे फॅसिस्ट आक्रमण रशियन राज्यक्रांतीची सर्वात मोठी अग्निपरीक्षाच होती .युद्धामुळे क्रांती ही थेट राष्ट्राच्या अस्तित्वाच्या प्रश्ना सोबत प्रथमच जोडली गेली.
त्यावेळच्या जगातील सर्वात बलाढ्य व महाकाय असे तीस लाख सैन्यासह हिटलरने सोवियत युनियन वर आक्रमण केले. त्याला थोपवण्यासाठी सोवियत सैन्य अर्थातच पुरेसं नव्हतं ,त्यामुळे सामान्य नागरिकांची भरती लष्करामध्ये सुरू झाली. विद्यापीठात शिकणारा विद्यार्थी ,शिक्षक ,फॅक्टरी कामगार ,शेतावर राबणारा शेतमजूर ,इतकेच नव्हे तर देशातील कवी, लेखक ,कलाकार ,डॉक्टर्स ,वकील इंजिनिअर समाजातील सर्वच स्तरातून लोकांची भरती लाल सेनेत झाली .विविध ठिकाणी लोकांनी स्वयंस्फूर्तीने यामध्ये वोलिंटीयर केलं. इतकेच नव्हे तर अगदी नुकताच शाळा संपवून आलेल्या मिसरूड न फुटलेल्या मुलांची देखील भरती सैन्यात झाली. या लाल सैन्यातील दोन तृतीयांश सैनिक असे होते की ज्यांनी आयुष्याची सुरुवात शेतमजूर म्हणून केली होती. त्यातील बहुतांशांनी कधी साधा इलेक्ट्रीक बल्ब देखील पाहिला नव्हता की सैन्यात दाखल होण्यापूर्वी कधी रेल्वेने प्रवास केला नव्हता ,युद्धाचे तंत्रज्ञान अवगत असणे खूप लांबची गोष्ट ! वर्ष-वर्ष शेतावर राबलेल्या शेतमजुरांना या युद्धाने थेट रणांगणावर वर उभे केले. युद्ध संपेपर्यंत जवळपास 3 कोटी सामान्य जनतेला सैन्यामध्ये मोबलाईज करावे लागले होते .1941 मध्ये नवीन भरती झालेल्या ह्या सैन्याचा मुकाबला जगातील सर्वात तगड्या व तंत्रकुशल नाझी फौजांशी होता तर चार वर्षात 1945 पर्यंत त्यांनी ह्या फौजेचा पराभव केला होता. हे कसे काय शक्य झाले?
युद्धात लढणाऱ्या सोवियत जनतेकडे आपण फक्त 1941 ते 45 या कालखंडा पुरताच बघितलं तर तिच्या लढ्याचे मर्म आपणास कळणार नाही. ही जनता कोणत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या महायुद्धात उतरली हे तपासले तर तिने दाखवलेल्या त्यागाचे आणि पराक्रमाचे आणि तिच्या शोकांतिकेचे देखील महत्त्व आपल्या लक्षात येईल. रशियासाठी विसावे शतक हेच मुळी वादळी सामाजिक- राजकीय बदल घेऊन आले. 1905 सालीच्या क्रांतीच्या प्रथम असफल प्रयत्नानंतर रशिया ( रशियन कवी आलेक्सांदेर ब्लोक यांच्या शब्दात )एक ज्वलंत ज्वालामुखी बनला होता ज्याचा कधीही उद्रेक होऊ शकत होता. त्यानंतर जी घटनांची मालिका सुरू झाली त्यामध्ये रशियन जनता जी भरडून चिरडून निघाली ती त्यामधून कधी बाहेर पडलीच नाही. दुसऱ्या महायुद्धापूर्वी च्या 25 वर्षात रशियन जनतेने इतका रक्तपात, हिंसाचार ,भय ,मृत्यू पाहिलेत की तिला नाझी विरुद्ध च्या युद्धाचं काही भय उरलं नव्हतं. पहिले महायुद्ध त्याच्या झळा ,त्यानंतर रशियन राज्यक्रांती , क्रांतीनंतर लगेच सुरू झालेलं सिविल वॉर जे चार वर्षे चाललं. लाखो लोकांचे प्राण तिने घेतले, त्यानंतर पडलेला भयंकर दुष्काळ आणि रोगराई, स्टॅलिनच्या उदयानंतर शेतीचे जबरदस्तीने केलेलं सामुहिकरण( जबरदस्तीने केलेल्या या सामूहिकरण्यात हजारो निष्पाप छोटे शेतमजूर शेतकऱ्यांचे प्राण गेलेत, लाखो खेड्यातील सामाजिक सांस्कृतिक जीवनाला सुरुंग लागला, तितकेच शेतकरी उद्धवस्त झालेत), 1933 सालचा दुष्काळ - त्याने जवळजवळ सत्तर लाख बळी घेतले, विशेषतः युक्रेन मध्ये सत्तेच्या अमानवी धोरणामुळे लाखो लोक उपासमारीने मेलेत. त्यानंतर सुरू झालेले स्टॅलिनचे दमणूक चक्र आणि दहशतीचा खेळ ,हजारो निरपराध लोकांची कत्तल, तुरुंगवास ,हद्दपारी श्रम छावण्यात ( गुलाग) रवानगी.1937 ला पुन्हा तेच फक्त - नव्या जोमानेेे- पक्षातील सदस्य , सामान्य जनता, बुद्धिवंत, कलाकार ,लेखक, लष्करी अधिकारी नोकरवर्ग ,डॉक्टर्स , समाजातील असा एकही घटक नव्हता की जो स्टॅलिन आणि त्याच्या व्यवस्थेच्या भयापासून मुक्त होता. स्टॅलिन च्या 1930 ते 1941 हा काळातील सोवियत समाज हा असा ट्रोमेटाइज्ड होता. सतत भीतीच्या -दहशतीच्या वातावरणात जगत होता- आज रात्री अटक होते का उद्या? देशाचे दुश्मन ,प्रति क्रांतिवादी, जनतेचा शत्रू ,परदेशाचा हेर असं कुठलेही खोटेनाटे आरोप ठेवून लाखो निष्पाप लोकांचा जीव स्टॅलिनच्या सत्तेने घेतला .गुलाग( सोवियत श्रम छावण्या) व्यवस्थेमुळे लाखो कुटुंब एकमेकापासून तुटली. आई ,वडील ,मुलगा ,मुलगी शेजार पाजार - कोणीही एकमेकाविरुद्ध कागाळी करून शकत होतं. गुप्त पोलिस खात्याने अटक केलेल्या माणसांचं पुढे काय झाले याचा थांगपत्ता देखील लागायचा नाही.सत्तेच्या दहशतीचा,दमनाचा परिणाम असा झाला की समाजात सर्वांच्या मनात एकमेकांविषयी संशय पेरला गेला. आणि हीच नागवलेली जनता 1941 ला हिटलरच्या राक्षसी फौजेला तोंड द्यायला उभी राहिली.
युद्धामध्ये सोवियत भूमीवर इतका रक्तपात का झाला? खरेच कोट्यावधी लोकांचा बळी जाणं गरजेचं होतं का? रेड आर्मी मध्ये इतकी प्राणहानी का झाली? विचारप्रणालीच्या ध्येयपूर्तीपुढे मानवी जीवनाचे मूल्य कवडीमोल ठरवणे ही स्टालिन प्रणित सोवियत सत्तेची विचारसरणी यासाठी मुख्यत जबाबदार आहे, असे मत इतिहासकार ओरलांडो फायजेस नोंदवतात. तसेच संपूर्ण युद्धाला देखील स्टॅलिन ची सोवियत सत्ता स्वतः कमी जबाबदार नव्हती. 23 ऑगस्ट 1939 ला हिटलर सोबत नॉन अग्रेशन गुप्त करार करून नाझींच्या आक्रमक युद्धखोरी ला स्टॅलिनेच खतपाणीच घातले होते. हा करार पुढे खूप वर्षांनी उघडकीस आला. करारानुसार सोवियत युनियन ला पश्चिम युक्रेन आणि बाल्टिक प्रदेशातील काही भागांवर अधिकार मिळाला तर सोव्हियत युनियनने जर्मनीला युद्धाचा कच्चामाल, अन्नधान्य ,खनिज तेल, कॉटन इत्यादी नैसर्गिक साधनसंपत्ती पुरवली - अगदी जर्मनीने उलटून त्यांच्यावर आक्रमण करेपर्यंत! करारामुळे हिटलरला सोवियत युनियन कडून युद्ध कालीन परिस्थितीत तटस्थतेची हमी मिळाली , आणि 1 सप्टेंबर 1939 ला जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले आणि दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटले. नाझी आक्रमणाच्या सुरुवातीस सोवियत लष्कराची जी प्रचंड हानी झाली त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे स्टॅलिनेच 1937 ला सुरू केलेल्या ग्रेट टेरर मध्ये चार वर्षाच्या कालावधीत जवळजवळ लाल सैन्यातील ऐंशी हजार अधिकाऱ्यांना मृत्युदंड दिला होता.( कारण तेच - स्टॅलिनची पेरोनोईड भीती) त्यामध्ये अर्ध्याहून जास्त रेजिमेंट कमांडर होते ; परिणामी युद्धाच्या सुरुवातीला लाल सेना ही अनुभवी नेतृत्वाच्या दृष्टिकोनातून खिळखिळी झाली होती. युद्धापूर्वीची दहशत ही युद्धात देखील सुरु राहिली . 8 जुलै 1942 ला स्टॅलीनने एक आदेश काढला - ऑर्डर नंबर 227- नॉट ए स्टेप बॅकवर्ड. त्यानुसार जे सैनिक सीमेवर घाबरतील, भीतीने माघार घेतील, किंवा कामचुकारपणा करतील त्यांना सरळ सरळ गोळ्या घालून ठार करण्यात येईल असा स्पष्ट फतवा होता. या विशेष कामासाठी सत्तेने एन के वी डी (गुप्त अंतर्गत पोलिस, कुख्यात केजीबी
ची पूर्वसुरी ) च्या तुकड्या उभ्या केल्या होत्या. या युनिटने सीमेवर लढणाऱ्या आपल्याच जवळजवळ दीड लाख सैनिकांना मागून गोळ्या घालून ठार केले, तर चार लाख पेक्षा जास्त सैन्याला तुरंगवासात पाठवले- भय इथले संपत नाही! विशेष बाब ही की हा आदेश 1988 पर्यंत कधीच जनतेपुढे आला नाही. गोरबाचेव्ह च्या काळात ग्लासनस्त ( माहितीतील मोकळेपणा) झाल्यानंतर इतिहासातील ही क्रूर बाब जनतेसमोर आली.
ज्या राजकीय सत्तेने आपल्याच जनतेची इतकी नागवणूक केली तिच्या संरक्षणासाठी मग ती युद्धात प्राणपणाने का लढली? बऱ्याच आधुनिक इतिहासकारांनी या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला ( उदा रीचर्ड ओवरी, कॅथरीन मेरीडेल) विशेषता 1988 नंतर रशियन आर्काव्हज् इतिहासकारांना खुले झालेत व बराचसा दाबला गेलेला इतिहास पुढे आला. सोवियत जनतेच्या लढ्यात सत्तेच्या विचार सरणीच्या प्रपोगंडााचा नक्कीच एक महत्त्वाचा वाटा होता कारण जी पिढी या युद्धात लढली त्यांना शाळेत बालपणापासूनच आपण क्रांतीचे रखवाले , नवीन समाजजीवनाचेेे निर्मााते आहोत अशी शिकवणूक बिंबविण्यात आली होती. परंतु पूर्ण युद्धात सोवियत जनतेने जो त्याग आणि धैर्य दाखवले त्याचे स्पष्टीकरण केवळ विचारसरणीच्या शिकवणीत मिळू शकत नाही. सामान्य सोवियत नागरिक व सैनिक लढत होता तो त्याच्या ‘रोदिना'साठी . रोदिना चा अर्थ मातृभूमी असा होतो ,परंतु इथेेेे कुुठलीही abstract संकल्पना अपेक्षित नाही ईवान चा( युद्धातील सामान्य रशियन सैनिकाचे कॉमन नाव) राष्ट्रवाद हा त्याच्या कुटुंबियांशी, मित्रांशी, त्याच्या गावाशी ,त्याच्या शहराशी जोडलेला होता .तो ज्या ज्या गोष्टींवर आणि व्यक्तींवर प्रेम करत होता त्याच्या रक्षणाकरिता तो सीमेवर गेला होता. जर्मन फौजने त्याच्या रोदिना चे जे जे हिरावून घेतलं होते ,ते तो परत मिळविण्यासाठी लढत होता. स्वतःच्या शहरावरील व गावावरील प्रेम हे सामान्य सोवियत नागरिकाच्या लढ्याचे एक अत्यंत महत्वपूर्ण वैशिष्ट्य! कारण युद्धातील सर्व महत्त्वाचे विजय हे शहराचे रक्षण करत असताना मिळवले होते( लेनिनग्राड, मॉस्को आणि स्टॅलीनग्राड) राष्ट्र नावाच्या अमूर्त संकल्पना अपेक्षा मूर्त स्वरूपातील स्वतःची माणसे आणि स्वतःची भूमी याकरिता सोवियत जनता युद्धात प्राणपणाने लढली म्हणून रशिया साठी हे महायुद्ध नव्हतं तर ‘ग्रेट पेट्रियोटिक वॉर होतं'. जो प्रखर राष्ट्रवाद रशियन जनतेने दाखवला तो त्यांच्या सांस्कृतिक इतिहासातून आला होता, सोवियत विचारसरणीतून नाही ! राष्ट्रवादा सोबत स्वतःच्या स्वप्नांसाठी देखील जनता लढत होती - युद्धात विजयानंतर थोडे तरी भयमुक्त जीवन मिळेल, सोवियत जीवनावरचा पडदा थोडा का होईना उघडेल आणि जीवन सामान्य पातळीवर येईल असा आशावादही सोवियत सैनिक बाळगून होता.
पण या आशा देखील युद्धसमाप्तीनंतर धुळीत मिळाल्या. नाझींवरील हा विजय सोवियत सत्तेसाठी स्वतःचे मानाचे पान बनले. 1917 च्या क्रांतीला आणि त्यानंतर समाजवादी जग निर्माण निर्माण करण्यासाठी स्टॅलीनने जे जे प्रयोग केले त्या सर्वांचे जस्टिफिकेशन करण्याचं एक मिथ बनलं .स्टॅलीनने युद्धातील लष्करी विजय सोवियत जनतेचे सामूहिक यश म्हणून नव्हे तर सोवियत सत्तेचा विजय म्हणून जगासमोर सादर केले. 1945 नंतर कुठल्याही सुधारणा किंवा शिथिलता देण्यात आल्या नाहीत. युद्धसमाप्ती म्हणजे कोलमडलेली अर्थव्यवस्था उभी करण्यासाठी पुन्हा पंचवार्षिक योजनेकडे मोर्चा ! पुन्हा एकदा सोवियत जनता एखाद्या ध्येयासाठी गुराप्रमाणे कामास जुंपली गेली. (जॉर्ज ऑरवेल ची ॲनिमल फार्म आठवा) शत्रुपक्षाच्या हातात पडलेल्या युद्ध कैद्यांची तर त्याहून वाईट हाल. ऑर्डर नंबर 270 या आदेशानुसार त्यांना मातृभूमीची द्रोह केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले - देशद्रोही! बहुतांशयांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं, तर इतर लाखो नागरिकांना सायबेरिया व इतर भागात श्रम छावण्यात पाठविण्यात आले. त्यांचा गुन्हा फक्त एकच होता - लकीर के उस पार ! जर्मनीने परत केलेल्या साडेपाच लाख युद्धकैदयांपैकी केवळ एक पंचमांश युद्धकैद्यांना सोवियत युनियन मध्ये पुन्हा नागरिक म्हणून राहण्यास परवानगी देण्यात आली. परंतु त्यांच्या प्रत्येक रेकॉर्ड'मध्ये ‘सामाजिक दृष्ट्या घातक ' असे शेरे नोंदविण्यात आले. त्यांना उच्च शिक्षण, मोठ्या नोकरीचे पदे इत्यादी मध्ये प्रवेश बंदी लागू केली. या युद्धानंतर स्टॅलिनच्या मनातील पाश्चिमात्य भांडवली राष्ट्र सोबतची युद्धभीती आणखीनच वाढली व पुढे येऊ घातलेल्या शीत युद्धासाठी कंबर कसुन समाजावरील त्याने आपली पोलादी पकड आणखी घट्ट केली. युद्धातून पुन्हा युद्धपूर्वकालीन दहशतीच्या साम्राज्यकडे ! युद्धातून होरपळून निघालेल्या सोवियत जनतेने काय कमावले ? इतिहासकार रिचर्ड ओवरी यांच्या शब्दात सांगायचं झालं तर पिचलेल्या जनतेच्या आत्मबलिदानाने त्यांना विजय जरूर मिळवून दिला ,परंतु मुक्ती मिळवता आली नाही .मुक्ती - भययुक्त जीवनपासून! युद्धविजयाने नाही परंतु 1953 ला स्टॅलिनच्या मृत्यू ने लाखो सोवियत नागरिकांसाठी भयापासून मुक्तीचे प्रवेशद्वार उघडे केले !
© इर्शाद बोरकर
संशोधक विद्यार्थी
इंग्रजी अधिविभाग
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
irshadruss@gmail.com
7020887352