अंतिम वर्षाच्या परीक्षा संदर्भातील राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत - अभाविप
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसापूर्वी यूजीसीने केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आज महाराष्ट्र शासनाने राज्यातील परीक्षा संदर्भात भूमिका स्पष्ट केली, याचे अभाविप स्वागत करते. अभाविप ने मागील अनेक दिवसांपासून प्रशासनाशी पत्रव्यवहार करत राज्यातील विद्यार्थ्यांची भूमिका आग्रहाने प्रशासन, कुलगुरू समिती, मा.राज्यपाल महोदयांच्या पुढे मांडली. आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी काही निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये विद्यार्थी शंका निरसन केंद्र विद्यापीठ स्तरावर उभारण्याचे, तसेच ग्रेडिंग नुसार देण्यात आलेले गुण जर विद्यार्थ्याला मान्य नसतील तर त्याची पुनर्परीक्षा घेण्यात येईल. या निर्णयाचे ही अभाविप स्वागत करते. प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना सरासरी गुणांच्या आधारे पुढील वर्षात प्रवेश देण्याचा निर्णय सद्यस्थितीची अपरिहार्यता लक्षात घेऊन घेतला असल्याने अभाविप प्रशासनाच्या याचे समर्थन करते.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी पत्रकार परिषद घेऊन परीक्षेसंदर्भात भूमिका स्पष्ट केली असली, तरीही काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रश्नाचे उत्तर प्रशासनाने तात्काळ देऊन विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर करावा. अशी मागणी अभाविपचे महाराष्ट्र प्रदेश मंत्री श्री स्वप्निल बेगडे यांनी केली आहे.
परीक्षा संदर्भातील काही अनुत्तरीत प्रश्न :
१. परीक्षा देणारे विद्यार्थी हे मोठ्या प्रमाणात आपल्या मूळ गावी परतले आहेत तसेच काही विद्यार्थी परराज्यात आपल्या मूळ गावी परतले आहेत त्या विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी येण्यासाठी काय उपाय योजना केली आहे ?
२. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रोजेक्टसाठी वेळ देणे आवश्यक आहे, त्याची स्पष्टता मंत्री महोदयांनी केली नाही. तसेच प्रोजेक्ट बनवण्यासाठी लागणारे साहित्य विद्यार्थ्यांना लॉकडाऊन मुळे मिळत नाही, यासंदर्भात देखील प्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी.
३. अनेक विद्यापीठांकडून मागील सत्राच्या पुनर्मूल्यांकनाचे निकाल अद्याप घोषित करण्यात आले नाहीत, हे निकाल त्वरित घोषित करण्यात यावेत.
४. प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क कधी व कसे परत करणार यावर देखील प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी.
५. अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे पूर्वीच्या सत्रातील काही विषय बाकी असल्यास त्या विद्यार्थ्यांची दोन्ही सत्रातील परीक्षा कोणत्या पद्धतीने घेणार ?
६. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकच्या परीक्षा संदर्भातील कोणतीही भूमिका प्रशासनाने स्पष्ट केली नाही याविषयातील भूमिका तात्काळ स्पष्ट करावी.
७. खाजगी विद्यापीठे राज्य शासनाच्या अंतर्गत येतात त्या विद्यापीठांच्या परीक्षा संदर्भात कोणतीही स्पष्टता विद्यार्थ्यांना मिळालेली नाही.
८. अनेक अभियांत्रिकी, विधी तसेच पदवीत्तर शाखेचे अभ्यासक्रम हे अपूर्ण आहेत. या शाखेतील विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम अपूर्ण असताना देखील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा घेण्यात येतील? या संदर्भात प्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी.
९. ज्या विद्यार्थ्यांना ATKT आहे तसेच जे विद्यार्थी नापास झाले आहेत अशा विद्यार्थ्यांची परीक्षा महाविद्यालय सुरू झाल्या नंतर १२० दिवसांनी घ्यायच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा. कारण त्यामुळे सदर विद्यार्थ्यांवर ATKT चे विषय व पुढील शैक्षणिक वर्षाचा नियमित अभ्यासक्रम याचा ताण येऊ शकतो. त्याचप्रमाणे विद्यापीठ प्रशासनावर देखील त्याचा अतिरिक्त ताण येईल. म्हणून अशा विद्यार्थ्यांची परीक्षा ही अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांची परिक्षा झाल्यावर लगेचच घेण्यात यावी.
१०. सध्याच्या सत्राचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य सरकारने ग्रेड पद्धत वापरण्याचे ठरवले आहे. यात ५० टक्के अगोदर चा परफॉर्मन्स व ५० टक्के या सत्राचा परफॉर्मन्स असे म्हटले आहे. परंतु अभियांत्रिकी शाखेचे दोनच महिने तासिका झाल्या आहेत. त्यात अभ्यासक्रम अपूर्ण आहे, नियमित प्रात्यक्षिक झाले नाहीत, Assignment झालेल्या नाहीत, अंतर्गत परीक्षा झालेल्या नाहीत. त्यामुळे सध्याचा सत्राचे ५० क्के मूल्यमापन कसे होईल? तसेच या अगोदर च्या परफॉर्मन्स वर ५० टक्के मूल्यमापन करत असताना ते मागील शैक्षणिक वर्षाचे मुल्यमापन होईल की पूर्ण प्रथम वर्षा पासून मूल्यमापन होईल? हे संभ्रम निर्माण होत आहेत. तरी त्याचे मूल्यांकन कसे केले जाईल ते स्पष्ट केलेलं नाही. प्रशासनाने याबाबत देखील भूमिका स्पष्ट करावी.
११. अंतिम वर्षाचे विद्यार्थी लॉक डाऊनमुळे घरी गेल्याने त्यांच्या अभ्यासाच्या नोट्स, संदर्भ पुस्तके वसतिगृह किंवा रूम वर आहेत, त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने ज्या अभ्यासक्रमावर परीक्षा होणार आहे त्या नोट्स अथवा संदर्भ पुस्तक विद्यापीठांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावेत.
महाराष्ट्र शासनाने वरील सर्व बाबींचा विचार करून योग्य ती भूमिका त्वरित स्पष्ट करावी. अशी मागणी अभाविप प्रदेश मंत्री श्री. स्वप्नील बेगडे यांनी केली आहे.