शेतकर्यांचे प्रतिबंधित बियाणे संदर्भात सविनय कायदेभंग आंदोलन

शेतकर्यांचे प्रतिबंधित बियाणे संदर्भात  सविनय कायदेभंग आंदोलन 



लातूर -.प्रतिनिधी 


  


संपुर्ण जग आज कोरोना संकटाशी लढत असताना राज्यातल्या बळीराजाच्या संकटाची मालिका काही संपत नाहीये. अस्मानी व सुल्तानी संकटाना धीराने तोंड देणार्या शेतकरी बांधवाला GMO बियाणावर घातलेला बंदीचा मोठाच फटका बसलाय. या निर्णयामुळे             


 शेतकर्‍यांना त्यांच्या आवडीनुसार कोणतेही बियाणे किंवा तंत्रज्ञान वापरण्याचे स्वातंत्र्य धोक्यात येत आहे. हे स्वातंत्र्य अबाधित रहावे यासाठी शेतकरी संघटनेने चालू खरीप हंगामात जनुकीय सुधारीत बियाणे ( जेनिटिकली मॉडीफाईड) कापुस, मका, भात,मोहरी, सोय‍बीन, वांगी इत्यादी पिकांची जाहीर लागवड करून सविनय कायदेभंग आंदोलन केले. या प्रतिबंधीत बियाण्याची लागवड केली म्हणुन शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल केल्यास शेतकर्यांची तुरुंगात जाण्याची तयारी असल्याचेही आंदोलकानी सांगितले 


      केंद्र सरकारने शेतीत काही प्रमाणात खुलीकरण करणे सुरु केले आहे, त्याचे स्वागतच आहे.पण जिएम तंत्रज्ञाना बाबत तातडीने निर्णय घेणे अपेक्षीत आहे. शासनाने बंदी उठविल्या नंतर बियाण्याच्या चाचण्या घेउन मान्यता मिळण्यास किमान तीन वर्षाचा कालावधी लागतो. सध्या तर कोणत्याही बियाणे उत्पादक कंपनीचा परवानगीसाठी अर्ज नाही. शासनाने बंदी उठविल्याचे जाहीर केल्या शिवाय सरकारकडे अर्ज प्राप्त होणार नाहीत. सरकारने तणनाशक रोधक कपाशीच्या (एचटीबिटी) बियाण्यावर बंदी घातलेली असली तरी राज्यात लाखो हेक्टरवर प्रतिबंधीत बियाणे वापरले जाते. या बियाण्याचा सर्व व्यापार काळ्या बाजारात होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अशुद्ध व कमी दर्जाचे बियाणे शेतकर्‍यांना विकले जाण्याची शक्यता असते. शेतकर्‍याची फसवणुक झाली असली तरी त्याला कोणा विरुद्ध कोठेही दाद मागता येत नाही. केंद्र शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाने जर या बियाण्या‍ना अधिकृत परवानगी दिली तर शेतकर्‍यांची फसवणुक होणार नाही व बियाण्यांचा काळाबाजारही थांबेल.


   आज जगभरा मध्ये अनेक जी.एम पिके घेतली जातात. कमी खर्चात जास्त उत्पादन काढल्यामुळे ते जगाच्या बाजारपेठेत कमी दराने शेतीमाल विकू शकतात. भारताला जर या देशांशी स्पर्धा करायची असेल जी एम पिकाशिवाय पर्याय नाही. या पार्श्वभुमीवर प्रतिबंधीत बियाणे चोरून न लावता जाहीरपणे लागवड करुन सरकारच्या धोरणाचा निषेध करीत कायद्याचा भंग केला आहे. शेतकर्याच्या हक्कासाठी आम्ही हे आंदोलन केले असुन शासनाने याची दखल घेवुन प्रतिबंधीत बियाण्यांवरची बंदी न उठवल्यास आंदोलन अजुन तीव्र करू अशी माहिती शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके यांनी महाराष्ट्र जीवनशी बोलताना दिली. 


  या आंदोलनावेळी शेतकरी संघटना राज्य कार्यकारिणी सदस्य माधव मल्लेशे,माजी जिल्हाध्यक्ष माधव कंदे, शिवाजी पाटील, युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके,कार्याध्यक्ष बालाजी जाधव, जिल्हाध्यक्ष मदन सोमवंशी,अशोक पाटील, हरिश्चंद्र सलगरे,कालीदास भंडे, किशनराव शिंदे, बाबुराव चामले, जनार्दन डाके,भूजंग रेड्डी, अशोक भोसले,करण भोसले,दगडुसाहेब पडीले,केशव धनाडे, शिवाजी बिराजदार,आण्णाराव चव्हाण,ईब्राहिम शेख,प्रताप पाटील आदि शेतकरी बांधव उपस्थित होते