चिंचोडी गावातील अवैध
वाळुमाफियांना आवर घाला : त्रस्त नागरिकांचे प्रशासनाला आवाहन
लातूर - प्रतिनिधी
14 july 2020
मागे काही दिवसापुर्वीच शहरातील मळवटी खणी भागात वाळुची तस्करी करणारे अवैध वाळुमाफियांचे 12 हायवा ट्रक महसुल प्रशासनाने पकडले होते. ही घटना ताजी असतानाच चिंचोडी गावातील नदीपात्रातल्या वाळुचा मोठ्या प्रमाणावर उपसा होत असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर वृत असे की,मांजरा नदीपात्रालगत असलेल्या चिंचोडी गावात अवैध वाळुउपसा प्रचंड प्रमाणात वाढला आहे. यामुळे स्थानिक पर्यावरणाला तर धोका पोचतच आहे पण सोबतच त्याठिकाणी वाळुउपसा करण्यासाठी येणारे टैक्टरसुद्धा विनानंबरप्लेट भरधाव वेगाने धावत आहेत, यातील अनेक टैक्टरचालक हे अल्पवयीन असुन त्यांच्याकडे अनुज्ञप्ती (लायसंस)सुद्धा नाही. या याबाबत ग्रामस्थांची प्रतिक्रिया घेतली असता, बहुतेक वाळुमाफियांना पोलिस प्रशासन व महसुल प्रशासनाचा वरहदस्त असुन त्यांच्या संगनमतानेच ही तस्करी होत आहे. बर्याचवेळा घरगुती व किरकोळ वाळुउपस्याचा परवाना काढुन मोठ्या प्रमाणात वाळुउपसा केला जातो. याबद्दल अनेक वेळा तहसीलदार कार्यालयात तक्रार देवुन व पाठपुरावा करूनही काहीच ठोस अशी कार्यवाही होत नसुन यावर प्रशासनाने गंभीर पावले उचलण्याची गरज आहे. अन्यथा येत्या काही दिवसात नदीपात्रागतच्या शेतकर्यांना याची मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. कारण सतत केलेल्या वाळुउपस्यामुळे नदीपात्रामध्ये
पडलेल्या खड्ड्यांचा अंदाज येणार नाही व मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी महाराष्ट्र जीवनशी बोलताना दिली.