जगा आणि जगु द्या : धनंजय मुंडेंच्या स्वीय सहायकानी केले प्लाझ्मा दान 

जगा आणि जगु द्या : धनंजय मुंडेंच्या स्वीय सहायकानी केले प्लाझ्मा दान 



 


बीड - प्रतिनिधी


July 15, 2020


 


कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असतानाच प्रशासन व आरोग्यकर्मींची मानवजातीला वाचविण्याची धडपड सुरू आहे.अशातच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील पहिली प्लाझ्मा थेरपी यंत्रणा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून अद्ययावत उपकरणांसह उपलब्ध झाल्यानंतर मंत्रीमहोदयांचे स्वीय सहायक प्रशांत जोशी यांनी कोरोना रूग्णासाठी स्वेच्छेने प्लाझ्माचे दान केले आहे. यामुळे रूग्णालयाच उपचार घेत असलेल्या दोन गंभीर रूग्णांचे प्राण वाचण्याची शक्यता बळावली आहे असे रूग्णालय प्रशासनाने सांगितले. याबाबत प्रतिक्रिया विचारली असता, "कोरोनातुन मुक्त झाल्यानंतर आज प्लाझ्मा दान करताना मला खुप आनंद होतो आहे, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी केलेल्या रक्तदान आणि प्लाझ्मा दान करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत मी हा प्लाझ्मा दान केला असून,याने एखाद्याचे प्राण वाचतील अशी माझी खात्री आहे. तसेच माझ्यानंतर कोरोनामुक्त होणार्या बांधवांनीही पुढे येऊन प्लाझ्मा दान करावा.व कोरोना विरुद्धच्या या लढ्याला बळ द्यावे असे आवाहन मी सर्वांना करतोय. असे मत प्रशांत जोशी यांनी मांडले.प्लाझ्मा प्रक्रियेमध्ये कोरोनामुक्त झालेल्या व स्वेच्छेने प्लाझ्मा दान करू इच्छिणाऱ्या रूग्णांची २८ दिवसानंतर कसुन तपासणी करून त्यांचा प्लाझ्मा घेतला जातो, ज्याद्वारे पुढील एक वर्षापर्यंत एखाद्या गंभीर कोरोना ग्रस्त रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी द्वारे उपचार करता येतो.


आज प्लाझ्मा दान करण्याचे जे दायित्व श्री. जोशी यांनी दाखवले आहे. हे पहिलेच प्लाझ्मा दान असून, कोरोनामुक्त झालेल्या अधिकाधिक सदृढ लोकांनी पुढे येऊन प्लाझ्मा दान करावा कारण याच प्लाझ्मा थेरपी द्वारे कोरोना ग्रस्त रुग्णांना नवसंजीवनी मिळणार असते,असे मत रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी सांगितले.यावेळी डॉ. देशमुख यांच्यासह वैद्यकीय अधीक्षक डॉ. राकेश जाधव, डॉ. शिवाजी बिराटे, डॉ. चव्हाण, रक्तपेढीचे प्रभारी डॉ. विनय नाळपे, डॉ. आरती बर्गे, डॉ. नारायण पौळ, डॉ. सुजित तुमोड, जगदीश रामदासी, सय्यद मुश्ताक, किरण चव्हाण, परमेश्वर मोरे आदी उपस्थित होते.