कोरोना विषाणू दुसरी बाजू...
जसं प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात त्याचप्रमाणे माझ्या दृष्टीने या कोरोना विषाणूचाही सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजूने विचार करणे गरजेचं आहे असं मला वाटतं. एका बाजूने विचार केल्यास फक्त मानवी आरोग्यावर च नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेवर पडसाद उमटवणारा हा व्हायरस जरी आपल्याला शाप भासत असेल परंतु त्याची दुसरी बाजूही पडताळून पाहणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणूनच मी दुसऱ्या बाजूचा विचार करून हा लेख लिहित आहे.
असा एक व्हायरस जो कधी नव्हे ते घरातील सर्व विखुरलेल्या सदस्यांच एकत्रीकरण करून सर्वांना गुण्यागोविंदाने घरात एकत्र राहायला शिकवतो. पाश्चात्य संस्कृतीच्या आहारी गेलेल्या लोकांना Handshake ऐवजी प्रणाम करायला शिकवतो आणि योग्य खानपान करण्यास भाग पाडून आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण रुजवायला लागतोय हा विषाणू. आज याच कोरोनाच्या कृपेमुळे प्रत्येक घरात पुन्हा एकदा एकोप्याने विचारविनिमय, गप्पागोष्टी करत असताना बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला जातोय.चार भिंतींच्या बंद खोलीत वर्षानुवर्षे स्त्री कशी राहते याची जाणीव करून देतो हा व्हायरस. त्यामुळे तू काय करते, तू फक्त घरातच तर असते असं नेहमी बोलणाऱ्या पुरुषमंडळींना आपली 'ती' घरातच काय काय करते याची प्रचिती यायला लागते. त्यामुळे आज प्रत्येक पुरुष हा घराचं घरपण जिच्यामुळे टिकून आहे तिच्यासाठी स्वयंपाकघरात तिच्या कामात हातभार लावायला लागलाय.
सब गुनहगार हैं कुदरत के कत्ल में
युंही ये हवांये जहरिली नहीं हुयी...
या ओळींप्रमाणे निसर्गासोबत खेळलात तर त्याचे दुष्परिणाम काय होतात याची जाणीव करून देणारा हा व्हायरस ज्याने सबंध जगाला झुकायला भाग पाडलं. एवढंच नाही तर जातीय, धार्मिक दंगली संपवणारा हा विषाणू आहे. ज्यामुळे आपल्या भारतासारख्या विविधतेने नटलेल्या या देशात जात, धर्म, पंथ सर्व भेदभाव विसरून धनधान्य, औषधी, जेवण किंवा विविध सेवांच्या माध्यमातून सर्वतोपरी माणूस हा आज माणसाच्या मदतीला धावून येतोय. त्यामुळे आज माणसाची माणसाला माणूस म्हणण्याची मानसिकता प्रत्येक माणसांमध्ये रुजायला लागलीय.
माणसांच्या गरजा कधीच संपत नसतात ही गोष्ट आज फोल ठरायला लागलीय. त्यातच जीवन कसं जगायचं याची शिकवण देणारी ही महामारी आहे असं मला वाटतं. ज्यामुळे लोकांचा गर्व कमी झाला, पैशापेक्षा माणुसकीची, धनापेक्षा जीवाची किंमत मोठी असते हे आत्मभान जागृत व्हायला लागलं. एवढंच नाही तर आज संपूर्ण देश जरी Lockdowm असला तरी उभ्या जगाचा पोशिंदा असणारा आपला शेतकरी हा अजूनही शेतात दिवसरात्र राबतोय. त्यामुळे शेतकऱ्यांचं महत्त्व सर्वांना उमजायला लागलंय. तसेच संकटकाळात देवासारखे धावून येणारे सर्व डॉक्टर्स, नर्सेस अशा सर्व कोरोना योध्यांची कदर करायला लावणारा हा विषाणू नक्कीच खूप काही सकारात्मक बदल घडवायला लागतोय. भारतातील बऱ्याच शहरांमधून हिमालय दिसू लागल्याची बातमी आपण ऐकलीच असेल.पक्षांनी पुन्हा शहरांकडे रेलचेल सुरू केलीय. आकाशातून प्रदूषणाचे थर कमी व्हायला लागलेत. अनेक जलमार्ग, नदी, नाले स्वच्छ झालेले पहायला मिळतात. असे कितीतरी सकारात्मक पडसाद उमटत असताना आपण पाहतोय. त्यामुळे स्वतःचे आरोग्य आणि निसर्ग संवर्धनाचा मूलमंत्र देणारा हा corona व्हायरस शाप की वरदान असा विचार करत असताना ही दुसरी बाजू तपासून पाहिल्यास एवढे सकारात्मक बदल घडवणारा हा व्हायरस मला वरदानच वाटायला लागतो. परंतु या विषाणूंमुळे होत असलेल्या जीवित आणि वित्त हानीचा विचार केल्यास जसं *सुखामागुन दुःख आणि दुःखामागुन सुख* हे निसर्गाचे कालचक्र प्रत्येकाच्या जीवनात येतच असते. सुखाचा काळ कितीही मोठा असला तरी तो छोटाच वाटतो आणि दुःखाचा काळ कितीही छोटा असला तरी तो मोठाच भासतो. त्यामुळे अकबर बिरबलाच्या कथेतील हे ही दिवस जातील 'एवढाच विचार करून प्रशासनाच्या नियमांच पालन करून आपण स्वयंशिस्त आणि नियोजनबद्ध धाच्यातून जगायला लागतो तर लवकरच आपण या कोरोनासारख्या महामारीवर, या आस्मानी संकटावर निश्चितच फत्तेशिकस्त मिळवू शकू. त्यामुळे lockdown चे कुलूप कसे आणि केव्हा उघडायचे याची चावी ही फक्त आणि फक्त आपल्याच हातात आहे.
©कल्पना फरकांडे ( सामाजिक कार्यकर्त्या व पर्यावरणस्नेही )